Belagavi

अनुसूचित जाती पोटवर्गवारी विधेयक म्हणजे समाजासाठी मरणपत्र ; आमदार कृष्णा नायक

Share

अनुसूचित जातींच्या पोटवर्गवारीसाठी आणलेले विधेयक हे संबंधित समाजासाठी मरणपत्र असून याविरोधात भविष्यात उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा हगरीबोम्मणहळ्ळीचे आमदार कृष्णा नायक यांनी दिला आहे.

सुवर्णसौध समोर माध्यमांशी बोलताना त्यांनी या विधेयकावर कडक शब्दांत टीका केली. अनुसूचित जाती पोटवर्गवारीच्या या निर्णयामुळे भोवी, कोरम, कोरचा, बंजारा आणि भटक्या विमुक्त समाजामध्ये संतापाची लाट असून सर्व समाजांनी याचा धिक्कार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

आरक्षणाच्या नव्या वाटणीवर भाष्य करताना त्यांनी नाराजी व्यक्त केली. डाव्या आणि उजव्या गटांना प्रत्येकी ६ टक्के आणि उर्वरित ६३ जातींना ५ टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले असून, यात भटक्या समाजाला केवळ १ टक्का आरक्षण दिले आहे. हा निर्णय म्हणजे समाजासाठी मरणपत्रच असून या अन्यायाविरोधात आगामी काळात मोठा लढा उभारला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

आदि कर्नाटक, आदि द्रविडी आणि आदि आंध्र समाजाला मोकळीक देतानाच, शक्तिहीन असलेल्या डाव्या समाजावर अटी लादून त्यांच्यावरही अन्याय करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. या विधेयकात तातडीने सुधारणा होणे गरजेचे असून, तसे न झाल्यास भाजपप्रमाणेच काँग्रेसची अवस्था होईल, अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला.

Tags: