जगाच्या विकासात निर्णायक ठरणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता, अवकाश आणि जैव तंत्रज्ञान संशोधनात भारत सध्या जगात ९ व्या स्थानावर आहे, अशी माहिती विश्वेश्वरैया तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. विद्याशंकर यांनी दिली.


बेळगाव येथील एस.जी. बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, तंत्रज्ञान प्रवाही असून त्यात सतत बदल होत असतात. प्रगत राष्ट्रांशी स्पर्धा करण्यासाठी तरुण संशोधकांनी संशोधनात स्वतःला झोकून देऊन भारताला जागतिक स्तरावर नेले पाहिजे. संशोधन केवळ प्रसिद्धीपुरते मर्यादित न ठेवता ते समाजाच्या समस्या सोडवणारे असावे. विशेषतः आरोग्य क्षेत्रातील आव्हाने आणि मधुमेहासारख्या वाढत्या आजारांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी हावेरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश जंगमशेट्टी यांनी ऊर्जा वापराबद्दल माहिती दिली. देशात ऊर्जेच्या वापराबाबतचा अचूक डेटा उपलब्ध नसल्यामुळे अनेक राज्यांना वीज टंचाईचा सामना करावा लागत आहे. संशोधकांसाठी डेटाचे डॉक्युमेंटेशन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला उपस्थित नागानूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामीजी यांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद देताना सांगितले की, विद्यार्थी दशेपासूनच संशोधक वृत्ती जोपासली पाहिजे, जी राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल.
एस.जी.बी.आय.टी. महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एफ. व्ही. मानवी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. प्राचार्य बी. आर. पटगुंदी यांनी स्वागत केले. यावेळी प्रा. सुपन्ना शिरगुप्पे, शंकरगौडा पाटील, अशोक हुलगबाळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments