Belagavi

आताही मीच मुख्यमंत्री आणि पुढेही मीच राहणार

Share

बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाबाबत अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट भूमिका मांडली. “राज्याचा मुख्यमंत्री आताही मीच आहे आणि पुढेही मीच राहणार,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

विरोधी पक्षांकडून वारंवार मुख्यमंत्री बदलाच्या मुद्द्यावरून केल्या जाणाऱ्या टीकेला उत्तर देताना त्यांनी हायकामांड आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश दिला. भाजप नेत्यांनी पाच वर्षे तुम्हीच मुख्यमंत्री राहणार का, असा सवाल विचारत त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता, मात्र सिद्धरामय्या यांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले.

सभागृहातील या राजकीय फटकेबाजीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे सिद्धरामय्या आपले पद अबाधित असल्याचे जाहीर करत असताना, दुसरीकडे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचा गट मात्र या विषयावर पूर्णपणे शांत असल्याचे दिसून आले. विरोधकांच्या प्रश्नांचा आणि मुख्यमंत्र्यांच्या विधानांचा कल ओळखून शिवकुमार समर्थकांनी मौन बाळगणे पसंत केले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे विरोधकांना तर स्पष्ट संदेश मिळालाच आहे, पण स्वपक्षीयांनाही त्यांनी आपली ताकद दाखवून दिल्याचे मानले जात आहे.

Tags: