Belagavi

दोन महिने मानधन उशिरा मिळाले म्हणजे तो घोटाळा होतो का? संतोष लाड

Share

उत्तर कर्नाटकच्या प्रश्नांवर अधिवेशनात चर्चा झाली नसल्याच्या आरोपाचा कामगार मंत्री संतोष लाड यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला. सभागृहात किती तास चर्चा झाली याची अधिकृत नोंद आहे, असे सांगतानाच, “रिकाम्या हाताने परतलो” असे म्हणणाऱ्या विरोधकांना आम्ही काय सुटकेस देऊन पाठवायचे होते का, असा खोचक सवाल त्यांनी केला.

बेळगाव येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी द्वेषपूर्ण भाषण प्रतिबंधक विधेयकाचे समर्थन केले. समाजात कोणीही कोणाबद्दलही अर्वाच्य भाषेत बोलू नये यासाठी हा कायदा आणला जात असून भाजप याला विरोध का करत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर बोलणाऱ्या भाजपला उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील पत्रकारांच्या हत्या विसरल्या आहेत का, असा टोलाही त्यांनी लगावला.

गृहलक्ष्मी योजनेत ५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याच्या आरोपाचे त्यांनी पूर्णपणे खंडन केले. केवळ दोन महिने मानधन मिळण्यास विलंब झाला म्हणजे तो घोटाळा ठरत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या योजनेत कोणतीही निविदा प्रक्रिया झालेली नाही किंवा पैसे इतर कोणाच्या खात्यात गेलेले नाहीत, त्यामुळे बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी विरोधकांनी पुराव्यानिशी बोलावे, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. मातृभूमीचा जप करणारे लोक देशातील विमानतळ, बंदरे आणि जमिनी अदानी-अंबानींच्या घशात घालत असल्याची टीका त्यांनी केली. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून हजारो कोटींची लूट करणाऱ्या भाजपला आमच्यावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Tags: