विधान परिषदेत ‘द्वेषपूर्ण भाषण प्रतिबंधक विधेयक’ चर्चेसाठी आले असता सभागृहात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमधील जोरदार वादावादीमुळे सभापतींना सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले.

सभागृहाचे कामकाज सुरू होताच भाजप आमदार सी. टी. रवी यांनी या विधेयकावर कडक शब्दांत टीका केली. “हे विधेयक संविधानातील कलम १९ नुसार मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. राजकीय सूड उगवण्यासाठी याचा वापर धोकादायक अस्त्र म्हणून होऊ शकतो. राज्य सरकारकडे असा कायदा करण्याचे सर्वाधिकार नाहीत,” असे ते म्हणाले.
यावर प्रत्युत्तर देताना गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी कलम १९ ची माहिती देत, सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात कोणतेही विधेयक आणत नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी सी. टी. रवी यांनी गांधीजींच्या ‘रघुपती राघव राजाराम’ या भजनाचा उल्लेख करत “देव एकच असून त्याची नावे अनेक आहेत” असे विधान केले. यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत, “नरेगा योजनेतून महात्मा गांधींचे नाव हटवणाऱ्यांना गांधीजींचे नाव घेण्याचा अधिकार नाही,” असा टोला लगावला. यावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला.
दरम्यान, विरोधी पक्षनेते छलवादी नारायणस्वामी यांनी “आम्ही बेंगळूरूहून येथे फक्त कुंदा खाण्यासाठी आलेलो नाही, तर चर्चा करण्यासाठी आलो आहोत,” असे सुनावले.
वादाचा पुढचा अंक तेव्हा सुरू झाला जेव्हा सी. टी. रवी यांनी अरबी भाषेतील एका संदर्भाचा उल्लेख केला. या उल्लेखावर सत्ताधारी सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. सर्व सदस्य एकाच वेळी उभे राहून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागल्याने गोंधळ वाढला. सभापती बसवराज होरट्टी यांनी सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. “सभागृहातील सदस्य पीठाचा अवमान करत आहेत,” असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, वादग्रस्त शब्द चुकीचा असल्यास तो कामकाजातून काढून टाकला जाईल, असेही स्पष्ट केले.
मात्र, तरीही दोन्ही बाजूंचे सदस्य शांत न झाल्याने सभापतींनी सभागृहाचे कामकाज ५ मिनिटांसाठी तहकूब केले.


Recent Comments