Belagavi

मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात सुवर्णसौधवर महिलांचा धडक मोर्चा

Share

हावेरी जिल्ह्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांचा छळ सीमा ओलांडत असून, या त्रासाला कंटाळलेले गरीब शेतकरी आणि शेतमजूर महिलांनी आज बेळगावच्या सुवर्णसौधसमोर भव्य निदर्शने केली.

कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी फायनान्स कंपन्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. या कंपन्यांचे प्रतिनिधी रात्रीच्या वेळी घरी येऊन महिलांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला. अव्वाच्या सव्वा व्याज वसूल करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि गरिबांचे मायक्रो फायनान्सचे कर्ज माफ करावे, अशी मागणी यावेळी सरकारकडे करण्यात आली.

आंदोलनादरम्यान शेतकरी संघटनेचे नेते हणमंतप्पा कब्बार म्हणाले की, आम्ही यापूर्वीही या कंपन्यांविरुद्ध अनेक लढा दिला आहे. आता उत्तर कर्नाटकचे प्रवेशद्वार असलेल्या हावेरीमधून आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, या भागातील महिलांचे सौभाग्य वाचवा आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना हाकलून लावा. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या असतानाही, कंपन्या त्यांचे उल्लंघन करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून महिलांचे १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करावे, अशी मागणी त्यांनी केली.

या आंदोलनामुळे सुवर्णसौध परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महिलांनी आपल्या व्यथा मांडताना सरकारकडे न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Tags: