Belagavi

हक्कीपिक्की समाजाचे सुवर्णसौधसमोर अनोखे आंदोलन

Share

संकटात सापडलेल्या हक्कीपिक्की समाजाने आज आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बेळगाव येथील सुवर्णसौधसमोर अनोखे आंदोलन केले. आम्हालाही हक्काचे घर, मुलांसाठी शिक्षण आणि सन्मानाने जगण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी आर्त हाक या समाजबांधवांनी दिली आहे.

हक्कीपिक्की जमात ही प्रामुख्याने जंगलात वास्तव्यास असणारी जमात आहे. मात्र, सध्या जंगलात राहिल्यास वनविभागाचे अधिकारी त्रास देतात आणि नागरी वस्तीत आल्यास पोलीस खोट्या आरोपांखाली अडकवतात, अशी व्यथा आंदोलक दिव्या यांनी मांडली. सरकारने आम्हाला जमीन आणि हक्काची घरे देऊन मुलांच्या शिक्षणाची सोय करावी, जेणेकरून आमचा समाज मुख्य प्रवाहात येईल, अशी मागणी त्यांनी केली.

हक्कीपिक्की जमात संपूर्ण देशात प्रसिद्ध असली तरी, अनेकवेळा आंदोलने करूनही कोणत्याही सरकारने आजवर आमच्याकडे लक्ष दिलेले नाही. आम्हीही भारतीय नागरिक आहोत, त्यामुळे आम्हाला मतदानाचे ओळखपत्र आणि इतर नागरी सुविधा देऊन मुख्य प्रवाहात येण्याची संधी द्यावी, अशी प्रतिक्रिया वाणीश्री यांनी व्यक्त केली.

यावेळी दलित संघर्ष समितीच्या (एन. शंकर गट) नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले असून, समितीचे राजशेखर हिंडलगी यांनी समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर माहिती दिली.

या आंदोलनात हक्कीपिक्की समाजातील नागरिक आणि दलित संघर्ष समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: