बेळगावच्या सुवर्णसौध येथे आज नगरविकास विभाग, नगरपालिका प्रशासन संचालनालय आणि बेळगाव महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने ई-खाता लोकार्पण, स्वच्छता कामगारांना नियुक्ती आदेश आणि घरांच्या हक्क पत्रांचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटन केले.


याप्रसंगी विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी, मंत्री बायराथी सुरेश, रहीम खान, एम.सी. सुधाकर, महापौर मंगेश पवार, कायदेशीर सल्लागार ए.एस. पोन्नण्णा, सलीम अहमद, आयवान डिसोझा, आमदार श्रीनिवास यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगरपालिका प्रशासन आणि हज मंत्री रहीम खान म्हणाले की, आमचे सरकार आल्यापासून नागरी सुविधांमध्ये मोठी सुधारणा करण्यात आली आहे. स्वच्छता कामगार पहाटेपासून शहराच्या स्वच्छतेत गुंतलेले असतात, त्यांच्या कष्टाची दखल घेऊन त्यांना आज शासकीय नियुक्ती पत्रे दिली जात आहेत. तसेच ई-खाते ऑनलाइन सेवा सुरू झाल्यामुळे आता नागरिकांना कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही, ते घरबसल्या आपली कागदपत्रे मिळवू शकतात.
बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले की, ई-खाते सुविधेमुळे सर्वसामान्य जनतेची मोठी सोय होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पारदर्शक कारभारासाठी हे नवीन पाऊल उचलले आहे. त्याचबरोबर शहराला स्वच्छ ठेवणाऱ्या कामगारांचा सन्मान झाल्याने त्यांच्या कामाला नवी उभारी मिळेल.
या कार्यक्रमाला उपमहापौर वाणी जोशी, महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. आणि इतर अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments