Belagavi

सुवर्णसौधसमोर दिव्यांग कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Share

राज्यातील ६,८६० मानधन तत्त्वावरील कार्यकर्त्यांना सामाजिक सुरक्षा द्यावी, किमान वेतन लागू करावे आणि त्यांची सेवा कायम करावी, या मागण्यांसाठी ‘नव कर्नाटक एम.आर.डब्ल्यू., व्ही.आर.डब्ल्यू. आणि यू.आर.डब्ल्यू. विकलांग मानधन कार्यकर्ते संघटने’ने सुवर्णसौधसमोर आंदोलन केले.

नव कर्नाटक एम.आर.डब्ल्यू., व्ही.आर.डब्ल्यू. आणि यू.आर.डब्ल्यू. विकलांग मानधन कार्यकर्ते संघटनेच्या वतीने आज बेळगाव येथील सुवर्णसौधसमोर हे आंदोलन करण्यात आले. राज्यातील ६,८६० मानधन कार्यकर्त्यांना सामाजिक सुरक्षा द्यावी, किमान वेतन लागू करावे आणि सेवा कायम करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी होती.

यावेळी आंदोलकांनी सांगितले की, “आम्ही १८ वर्षांपासून सेवा देत आहोत. पूर्वी आम्हाला केवळ ७५० रुपये मानधन मिळत होते. एप्रिलमध्ये आम्ही श्रीरंगपट्टण मंदिर ते डीसी कार्यालयापर्यंत आंदोलन केले, त्यानंतर मानधनात १ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आणि आता १०,००० रुपये मानधन मिळत आहे. सिद्धरामय्या विरोधी पक्षात असताना त्यांनी मुख्यमंत्री होताच किमान वेतनच नव्हे तर सेवा कायम करण्याचेही आश्वासन दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. आमचा कामाचा ताण वाढला आहे आणि मानधन कमी आहे, अशा परिस्थितीत जीवन जगायचे कसे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शासकीय प्रतिनिधी म्हणून मंत्री एच. मुनियप्पा यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले आणि सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी राज्यभरातील मोठ्या संख्येने दिव्यांग कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.

Tags: