Chikkodi

चिक्कोडी जिल्ह्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला वकिलांचा पाठिंबा

Share

चिक्कोडीला स्वतंत्र जिल्हा करण्याचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. या आंदोलनाला वकिलांनी पाठिंबा जाहीर करून चिक्कोडी जिल्हा व्हावा, अशी मागणी लावून धरली आहे.

न्यायालयापासून या निषेध रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली बसव सर्कल मार्गे तहसीलदार कार्यालयापर्यंत गेली. निषेध रॅलीदरम्यान वकिलांनी चिक्कोडी जिल्हा करण्याची जोरदार मागणी केली. त्यानंतर, त्यांनी ग्रेड-२ तहसीलदार परमिळा देशपांडे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.

वकील संघाचे अध्यक्ष कलमेश किवड म्हणाले की, “जे. एच. पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी चिक्कोडी आणि गोकाकला जिल्हा म्हणून घोषित केले होते. त्याच धर्तीवर या सरकारने चिक्कोडीला स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित करावे. चिक्कोडी जिल्हा कृती समितीला आमच्या वकिलांचा संपूर्ण पाठिंबा आहे.”

त्यानंतर, जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष एस. वाय. हंजी म्हणाले की, “दिवसागणिक चिक्कोडी जिल्हा आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे. आज वकिलांनी आमच्या लढ्याला पाठिंबा दिल्याने आम्हाला हत्तीचे बळ मिळाल्यासारखे वाटत आहे.”

यावेळी रमेश हित्तलमनी, एस. वाय. पाटील, बी. आर. यादव, सुदर्शन तम्मणणावर, भीमगौडा खोत, निरंजन कांबळे, रंजना करनुरे, माणिक्या कबाडगे, मीनाक्षी पाटील, चलवक्का गडकरी, सुरेश बॅकूडे, नागेश माळी, चन्नप्पा बडिगेर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

Tags: