कल्ट’ हा कन्नड चित्रपट आगामी २३ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असून, बेळगावच्या नागरिकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपटाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन अभिनेता झैद जमीर अहमद खान यांनी केले.

आज बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘कल्ट’ हा चित्रपट कुटुंबासोबत पाहण्यासारखा आहे. यात एक सामाजिक संदेश देण्यात आला आहे. ‘आम्हाला राजकारणात कोणतीही आवड नाही. आम्ही अभिनयाची आवड असल्यामुळे चित्रपटाची निर्मिती केली आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. चित्रपट चित्तदुर्ग, म्हैसूर आणि बेंगळुरूसह संपूर्ण कर्नाटकात चित्रित करण्यात आला आहे. इतर चित्रपट उद्योगांना स्पर्धा देण्यासाठी कन्नड चित्रपट बनवले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.
राजकारण्यांच्या मुलांना चित्रपट निर्मितीची आवड कशी निर्माण झाली, असे विचारले असता ते म्हणाले, “माहित नाही. लहानपणापासून अभिनयात आवड आहे. आम्हाला राजकारणाची लालसा नाही. कोणत्याही क्षेत्रात राहून आपण जनसेवा करू शकतो. आमच्या चित्रपटामध्ये आम्ही नवीन कलाकारांना संधी दिली आहे. मृणाल हेब्बाळकर आणि अमान सेठ तयार असतील तर त्यांच्यासोबतही चित्रपट करण्यास आम्ही तयार आहोत,” असे ते म्हणाले.
यावेळी काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर, अमान सेठ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments