Belagavi

विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे सुवर्णसौधसमोर भव्य आंदोलन

Share

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी राज्य शेतकरी संघटना आणि हरितसेनेच्या वतीने बेळगाव येथील सुवर्णसौधसमोर भव्य आंदोलन करण्यात आले. यामध्ये हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन सरकारबद्दल तीव्र असंतोष व्यक्त केला.

यावेळी बोलताना शेतकरी नेते चूनप्पा पुजारी म्हणाले की, शेतकरी विरोधी कायदे तातडीने मागे घ्यावेत. वनक्षेत्राजवळील शेतकऱ्यांच्या संरक्षणाची काळजी घ्यावी. गावातील रस्त्यांची सुधारणा करावी. वनजमिनीवरील अतिक्रमण कायद्यातील विविध मागण्या पूर्ण कराव्यात. केपीटीसीएल स्टेशनसाठी जमीन देण्याच्या नियमांमध्ये सुधारणा करावी. शेतकऱ्यांच्या शेतांना पाणी देण्यासाठी दिवसा १२ तास वीज पुरवठा करावा. ‘अवैध-वैध’ योजना बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपये जमा करणे शक्य होत नाहीये. दूध प्रति लिटर १०० रुपये जाहीर करावे आणि मक्याचे खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे, अशा मागण्या त्यांनी केल्या.

दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे एपीएमसी आणि साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी सांगितले. ‘शेतकऱ्यांच्या समस्यांवर निश्चितच तोडगा काढला जाईल. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे.’ “सावरवाडी येथील ऊस जाळण्याची घटना व्हायला नको होती. ही दुर्दैवी गोष्ट आहे. गुरलापूरचे आंदोलन हे संपूर्ण राज्यातील शेतकरी संघटनेची शक्ती दर्शवणारे होते. शेतकऱ्यांनीसंयम दाखविला,” असे मत त्यांनी व्यक्त केले. पुढे ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी १० वर्षे पंतप्रधानपदावर राहावे, पण शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव द्यावा,” अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी विविध भागातून आलेल्या हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.

Tags: