Belagavi

गोहत्या प्रतिबंधक कायद्यातील बदलांच्या विरोधात विहिंपचे आंदोलन

Share

कर्नाटक गोहत्या प्रतिबंधक आणि संरक्षण कायद्यातील प्रस्तावित सुधारणेला विरोध करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आज चन्नम्मा चौकात जोरदार आंदोलन केले.

सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत या कायद्याच्या कलम ६(४) मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. या सुधारणा राज्याच्या आणि हिंदू समाजाच्या हिताविरुद्ध असल्याचे सांगत, सरकारने हा बदल विधानसभेत मांडू नये, अशी मागणी करत आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चन्नम्मा चौकात आंदोलन केले.

यावेळी बोलताना जैन समाजाचे सचिव राजेंद्र जैन यांनी सरकारवर निशाणा साधला. “राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत गोहत्या प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. गोवंशाची हिंसक वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडल्या जात नाहीत आणि पकडल्या तरी लगेच सोडले जाते, त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल होत नाही. हा कसला न्याय आहे? गाय आमची माता आहे, तिच्या कायद्याविरुद्ध वागणे किती योग्य आहे? आरोपींवर गुन्हा न दाखल करता २४ तासांत त्यांना सोडणारे हे कसले सरकार? ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असे करू नका,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर संताप व्यक्त केला.

त्यानंतर हिंदू संघटनेचे नेते कृष्ण भट यांनी भाष्य केले. “हा गोहत्या बंदी कायदा २०२० मध्ये सुरू झाला. याच बेळगाव अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांच्याकडे आग्रह करून, त्यांना गोमातेचे महत्त्व पटवून देऊन, त्या सरकारने बंदी कायद्याचा निर्णय घेतला. पण दुर्दैवाने आता त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न होत आहे. आई नसतानाही आम्ही तिचे दूध पिऊन मोठे झालो आहोत. त्यामुळे प्रत्येकाने रस्त्यावर उतरले पाहिजे आणि हा कायदा रद्द होऊ नये म्हणून लढा दिला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.

२०२१ मध्ये कायदा लागू झाल्यानंतर गोवंशाची क्रूर वाहतूक कमी झाली असली तरी, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यामुळे अनेक ठिकाणी पैशाच्या लोभापायी जनावरांची क्रूर वाहतूक सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या आंदोलनात प्रमोद ओक्कुंदमठ, स्वरूप कालकुंद्री, आनंद करलिंगन्नवर, नागेश कांबळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: