Belagavi

लिंगायतांवरील हल्ल्याला एक वर्ष; बेळगावात अत्याचार निषेध दिन

Share

गेल्या वर्षी बेळगावात पंचमसाली समाजाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज ‘अत्याचार निषेध दिन’ पाळण्यात आला. आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांवर थेट हल्ला चढवत, मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या समाजाला आणि लिंगायत समाजालाही धोका दिला आहे, अशी टीका त्यांनी केली.

वर्षापूर्वी बेळगावात पंचमसाली समाजाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी आज बेळगावातील गांधी भवनातून कूढलसंगम पीठाचे जगद्गुरू बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली अत्याचार निषेध दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून मूक मोर्चा काढला. राणी चन्नम्मा चौकात आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ, माजी मंत्री सी.सी. पाटील यांच्यासह अनेकांनी जमिनीवर बसून आंदोलन केले.

यावेळी बोलताना यत्नाळ म्हणाले, “गेल्या वर्षी शांततापूर्ण रॅली काढत असलेल्या पंचमसाली समाजावर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार लाठीचार्ज करण्यात आला होता. आमदार होईपर्यंत मोठेमोठी आश्वासने देणाऱ्यांनी, नंतर त्यांच्या कारस्थानाने आमच्यावर क्रूर लाठीचार्ज केला.” त्यांनी मागणी केली की, मराठा, जैन आणि लिंगायत समाजाला ‘२-ए’ आरक्षण दिले पाहिजे. “टिपू सुलतान जयंतीबद्दल प्रश्न विचारणारे आमदार आरक्षणासाठी आवाज उठवत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत हा विषय विचारला असता, ते याला असंवैधानिक म्हणतात. मग अन्य समाजाला दिलेले आरक्षण घटनात्मक आहे काय? मुख्यमंत्र्यांनी आपल्या समाजासह लिंगायत समाजालाही धोका दिला आहे. तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्या सरकारला जनता येणाऱ्या काळात योग्य धडा शिकवेल,” असा इशारा यत्नाळ यांनी दिला.

Tags: