Belagavi

लिंगराज महाविद्यालयाला सलग नवव्यांदा ‘समग्र वीररत्न’ पुरस्कार

Share

राणी चन्नम्मा विद्यापीठाने बेळगाव येथील जिल्हा क्रीडांगणावर आयोजित केलेल्या नवव्या अॅथलेटिक क्रीडा स्पर्धेत केएलई संस्थेच्या बेळगाव येथील लिंगराज महाविद्यालयाने १७ विक्रमांसह सलग नवव्यांदा ‘समग्र वीररत्न’ पुरस्कार जिंकला.

पुरुषांच्या विभागात १४ सुवर्ण, ८ रौप्य आणि २ कांस्य पदकांसह महाविद्यालयाने या विभागाचा ‘समग्र वीररत्न’ पुरस्कार जिंकला. महिलांच्या विभागात ८ सुवर्ण, ५ रौप्य आणि ३ कांस्य पदकांसह महाविद्यालयाने महिलांच्या विभागाचा ‘समग्र वीररत्न’ पुरस्कार पटकावला.

केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात अशी कामगिरी करावी की, त्यांनी एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करावे. या माध्यमातून त्यांनी जागतिक स्तरावर देशाचा मान वाढवावा.

क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या विभागातील वैयक्तिक ‘वीररत्न’ पुरस्कार भूषण पाटील याला, तर महिलांच्या विभागातील वैयक्तिक ‘वीररत्न’ पुरस्कार वैभवी बुद्रूक हिला मिळाला. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या क्रीडा स्पर्धेत मागील स्पर्धांचे विक्रम मोडून १७ नवीन विक्रम स्थापित केले. १०० मीटर पुरुष शर्यतीत भूषण पाटील, १०० मीटर महिला शर्यतीत वैभवी बुद्रूक, १०० आणि २०० मीटर महिला अडथळ्यांच्या शर्यतीत अपूर्वा नायक, ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत संजय नाईक, २०० आणि ४०० मीटर पुरुष शर्यतीत श्रीनाथ दळवी, ५००० मीटर पुरुष शर्यतीत विजय सावतकर, पुरुषांच्या गोळाफेक मध्ये चन्नवीरेश हिक्कीमठ, महिलांच्या गोळाफेकमध्ये स्प्रुह नाईक, पुरुषांच्या भालाफेकीत शशांक पाटील, ४००x१०० मीटर महिला रिले शर्यत आणि ४००x४०० मीटर मिक्स रिले शर्यतीत हे नवीन विक्रम नोंदवण्यात आले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे केएलई संस्थेचे प्रशासन मंडळाचे संचालक, सचिव तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हनुमंत मेलिनमनी, क्रीडा आणि शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सी. रामा राव, जिमखाना उपाध्यक्ष विनायक वरुटे आणि सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Tags: