Athani

अथणीला स्वतंत्र जिल्हा घोषित करण्याची मागणी

Share

जर चिकोडीला जिल्हा म्हणून घोषित केले जात असेल, तर अथणीलाही तातडीने जिल्हा जाहीर करावे. या मागणीला विरोध करणाऱ्या आमदारांना निवडणुकीत ‘धडा शिकवला जाईल’, असा थेट इशारा अथणी जिल्हा कृती समितीच्या आंदोलकांनी दिला आहे.

आज अथणी तालुक्याला जिल्हा केंद्र म्हणून घोषित करण्यासाठी डॉ. आंबेडकर चौकात पक्षविरहित आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना शशिकांत गुरुजी म्हणाले, “मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अथणी जिल्हा निर्मितीसंदर्भात सोमवारी बैठक बोलावली आहे. अथणीतील नागरिकांना बेळगावपर्यंत येण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे चिकोडीसोबतच अथणीलाही जिल्हा म्हणून घोषित करावे.” अन्यथा, आगामी काळात अथणीतून बेळगावपर्यंत ५० हजार नागरिकांचा पायी मोर्चा काढून आंदोलन करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

इतर आमदारांनीही अथणीला जिल्हा करण्याच्या मागणीला पाठिंबा द्यावा. अथणीला जिल्हा बनवण्यास जो आमदार विरोध करेल, त्याला भविष्यात योग्य धडा शिकवला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या आंदोलनात अथणी जिल्हा कृती समितीचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: