सुवर्णसौधमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सरकारच्या नेतृत्वाच्या स्थिरतेवर, भाजपच्या आंदोलनावर आणि बेळगाव जिल्हा विभाजनासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले.

सरकारमध्ये नेतृत्व बदलणार असल्याच्या भाजपच्या वक्तव्यांना मंत्र्यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले, “भाजपवाले सत्तेवर आल्याच्या पहिल्या दिवसापासून हेच सांगत आहेत. आता तर ते ‘आणखी ३-६ महिने’ असे म्हणत आहेत. राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री एकसंध आहोत, सरकार सुरळीतपणे काम करत आहे.”
बेळगाव जिल्हा विभाजनाबद्दल बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले, “याबाबत मुख्यमंत्री आधीच बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे. याच अधिवेशनाच्या काळात आमदारांसोबत बैठक घेऊन चर्चा केली जाईल.” अधिवेशन काळात उत्तर कर्नाटक आणि हैदराबाद कर्नाटक भागातील समस्यांवर योग्य चर्चा होत नाही. उद्यापासून चर्चा योग्य दिशेने व्हावी यासाठी आम्ही अध्यक्षांवर दबाव आणू, अशी ग्वाही मंत्र्यांनी दिली. भाजपने अविश्वास ठराव मांडण्याची तयारी करण्यावर ते म्हणाले, याचा परिणाम शून्य आहे. यापूर्वीही असे प्रयत्न अपयशी ठरले आहेत, असे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
शेतकरी समर्थक भाजपच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, पण ते आंदोलन न्यायसंगत असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अहिंदा (अल्पसंख्याक, मागास आणि दलित) नेतृत्वाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाल्यास पाहू. सध्या त्याचा एक भाग म्हणून काम करत आहोत, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीबद्दल दिली.


Recent Comments