कर्नाटक राज्यात सत्ताधारी पक्षाच्या अंतर्गत गटबाजीमुळे प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केली.

आज बेळगावमध्ये बोलताना बी. वाय. विजयेंद्र यांनी आरोप केला की, केंद्र सरकारने एमएसपीचा दर ₹४०० ने निश्चित केला असला तरी, राज्य सरकारने खरेदी केंद्रे सुरू केली नाहीत. केवळ ऊसच नव्हे, तर कापूस, मका यांसारख्या अनेक पिकांना योग्य दर मिळत नाहीये. ‘बोलल्याप्रमाणे वागू’ असे सांगणाऱ्या सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. भ्रष्टाचार वाढला असून, तरुणांना रोजगार न मिळाल्यामुळे त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. विणकरांच्या समस्यांकडेही सरकारने दुर्लक्ष केले आहे, असा संताप विजयेंद्र यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री पदासाठी सुरू असलेल्या वादाचा परिणाम राज्याच्या प्रशासनावर झाला आहे. राज्याच्या अनेक ज्वलंत समस्यांवर चर्चा व्हायला हवी, हे सर्व विषय सभागृहात चर्चेला आणू, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही, या काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्याला उत्तर देताना बी. वाय. विजयेंद्र यांनी पलटवार केला. ते म्हणाले, “लंडनमध्ये काय झाले, यावर चर्चा नको; राज्यातील समस्यांवर चर्चा करा. अशी निरर्थक उत्तरे देणे बंद करा.” सत्ताधारी पक्ष ‘वोट चोरी’ असे म्हणत ‘लूट’ करत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आणि कर्नाटक राज्याला एटीएम बनवल्याचा हल्लाबोल केला. यावर सभागृहात चर्चा करू, असे आव्हान विजयेंद्र यांनी काँग्रेसला दिले. राज्यातील शेतकरी, तरुण आणि सामान्य जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून अंतर्गत वादात अडकलेल्या राज्य सरकारच्या अपयशाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करणार असल्याचे बी. वाय. विजयेंद्र यांनी स्पष्ट केले.


Recent Comments