Belagavi

बेळगाव अधिवेशनात आर. अशोक आणि बी. के. हरिप्रसाद यांच्यात शाब्दिक चकमक

Share

बेळगाव येथील सुवर्णसौधमध्ये सुरू असलेले हिवाळी अधिवेशन म्हणजे केवळ ‘औपचारिकतेचे अधिवेशन’ आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केली आहे, तर दुसरीकडे काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांनी भाजपच्या आंदोलनाला ‘हास्यास्पद’ असे संबोधत पलटवार केला आहे.

जुने म्हैसूर आणि उत्तर कर्नाटक हा भेदभाव संपुष्टात यावा या उद्देशाने येथे अधिवेशन घेतले जात आहे. मात्र, सरकार केवळ विधेयके मंजूर करून घेण्यासाठी अधिवेशनाचा उपयोग करत आहे. हे औपचारिकतेचे अधिवेशन असून, विधेयके तर बेंगळुरूमध्येही सादर करता येतात. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकण्याची या सरकारला इच्छा नाही, ते केवळ मजा करण्यात वेळ घालवत आहेत. उद्या (बुधवारी) आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करून सुवर्णसौधाला घेराव घालणार आहोत, असे आर. अशोक म्हणाले.

यावर प्रत्त्युत्तरादाखल बी. के. हरिप्रसाद म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न पुढे करून भाजपने आंदोलन करणे हास्यास्पद आहे. हरियाणात जेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन केले, तेव्हा मोदींनी त्यांच्या समस्या ऐकल्या नाहीत. शेतकऱ्यांविषयी बोलण्याचा भाजपला कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. मी सिद्धरामय्या यांचा उजवा हात आहे, असे तुम्हाला वाटत असेल, तर ते तुमचे मत आहे.

बेळगाव अधिवेशन उत्तर कर्नाटकातील ज्वलंत समस्यांवर चर्चा करण्याऐवजी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय चिखलफेकीचे साक्षीदार ठरत आहे. तुंगभद्रा धरणाचे दरवाजे तुटून वर्ष झाले तरी बिले देण्याची योग्यता या सरकारमध्ये नाही. पंतप्रधानांच्या भेटीसाठी वेळ नसलेल्या लोकांना नाश्त्यासाठी मात्र वेळ मिळतो. “भाजपला नैतिक अधिकार कुठे आहे?” अशा शब्दांत बी. के. हरिप्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Tags: