Belagavi

उत्तर कर्नाटकच्या समस्या सोडवण्याबाबत सरकारला गांभीर्य नाही : चलवादी नारायणस्वामी

Share

उत्तर कर्नाटकमधील समस्यांवर चर्चा करून त्या मार्गी लावण्यासाठी केवळ नऊ दिवसांचे अधिवेशन पुरेसे नाही. राज्य सरकारमध्ये या प्रश्नांवर गांभीर्य नाही. येथील समस्यांची दखल न घेणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आणण्याचे काम आम्हाला करावे लागेल, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी यांनी केले.

मंगळवारी विधानसौधमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. उत्तर कर्नाटकमधील समस्या सोडवून विकास साधण्यासाठी बेळगाव येथे हिवाळी अधिवेशन आयोजित केले जाते. मात्र, १० दिवसांत सर्वंकष चर्चा आणि समस्यांचा निपटारा करणे अशक्य आहे. यंदा केवळ नऊ दिवसांचे अधिवेशन आयोजित केल्याने सरकारला या विषयाचे गांभीर्य नाही हे स्पष्ट होते. दोन्ही सभागृहांमध्ये संघर्ष करण्यासाठी भाजप सज्ज आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

शाळा, शिक्षक, अंगणवाडी, पीडीओ, तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी आम्ही नियम ३७७ अंतर्गत सूचना मांडण्याची तयारी केली आहे. दक्षिण भागातील समस्यांवर बेंगळुरू येथे चर्चा करता येईल, परंतु येथे उत्तर कर्नाटकातील समस्या सोडवण्यासाठी विधेयकांवर चर्चा करणार आहोत. मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधी पक्षाने काहीही विचारले तरी आम्ही त्याची दखल घेत नाही. जर त्यांचे डोके ठिकाणावर असेल तर त्यांनी दखल घ्यावी. जनतेच्या समस्या सोडवण्यास असमर्थ ठरलेल्या सरकारचे डोके ठिकाणावर आणण्याचे काम करावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Tags: