आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या पंचमसाली समाजाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी, १० डिसेंबर रोजी ‘लिंगायत अत्याचारी दिन’ म्हणून पाळण्यात येणार आहे. यावेळी सर्वांनी काळ्या फिती लावून मूक मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी केले आहे.

आज बेळगाव येथील कन्नड साहित्य भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. १० डिसेंबर २०१४ रोजी पंचमसाली लिंगायत आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याची दखल घेऊन, त्या घटनेचा निषेध करण्यासाठी १० डिसेंबर रोजी, सकाळी १० वाजता, बेळगाव येथील महात्मा गांधी भवन येथून काळ्या फिती लावून ‘लिंगायत अत्याचारी दिन’ पाळत निषेध मोर्चा काढण्यात येईल. लिंगायत धर्माच्या सर्व आमदारांनी त्या दिवशी सभागृहात काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करावा. आंदोलनामुळे न्यायमूर्तींनी चौकशी सुरू केली असून, त्याचा अहवाल अजून बाकी आहे. या मूक सत्याग्रहात समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
पंचमसाली आंदोलनाला मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्याच दिवशी ‘असंविधानिक’ ठरवल्याची खंत स्वामीजींनी व्यक्त केली. ते म्हणाले, १० डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्र्यांनी यावर निर्णय घ्यावा. आमदारांना आरक्षणाबद्दल बोलता येत नसेल, तरी किमान त्यांनी हल्ल्याचा निषेध करावा. सत्ताधारी आमदारांनी निषेध न केल्याने, केवळ विरोधी पक्षाचे आमदारच आंदोलकांच्या पाठीशी उभे राहिले, अशी टीका त्यांनी केली. जनादेशानुसार आंदोलन सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इतके दिवस शांत बसलेल्या आमदारांना आरक्षणाची मागणी करताना संकोच वाटत असेल, तर त्यांनी किमान पंचमसाली कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करावी. राज्य सरकारला कान असूनही बहिरे आणि डोळे असूनही आंधळे झाले आहे. त्यांनी सौजन्यानेही हल्ला झालेल्यांना भेटून विचारपूस केली नाही, असा आरोप स्वामीजींनी केला.


Recent Comments