Belagavi

‘महामेळाव्या’ला परवानगी न दिल्यास महाराष्ट्रात कर्नाटकच्या नेत्यांना ‘नो एन्ट्री’

Share

‘महाराष्ट्र एकीकरण समिती’च्या नेतृत्वाखाली होणाऱ्या बेळगाव येथील ‘महामेळाव्या’ला परवानगी न देता, मराठी भाषिकांच्या भावना दडपण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने केल्यास, महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटकच्या कोणत्याही राजकारण्याला आम्ही फिरकू देणार नाही, असा स्पष्ट इशारा कोल्हापूर शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी दिला आहे.

कर्नाटक सरकार दरवर्षी बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन आयोजित करते. दुसरीकडे, महाराष्ट्र एकीकरण समिती याच वेळी ‘महामेळावा’ घेऊन मराठी भाषिकांच्या भावना व्यक्त करते. परंतु, बेळगावचे जिल्हाधिकारी या महामेळाव्याला परवानगी देत नाहीत.

या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेने कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून ‘महामेळाव्या’ला परवानगी देण्याची मागणी केली. विजय देवणे म्हणाले की, “महामेळाव्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह इतर पक्षांचे नेते बेळगावला जाणार आहेत. त्यांना कर्नाटक सरकारने कोणताही निर्बंध लावू नये.”

देवणे यांनी पुढे ठामपणे सांगितले की, “जर कर्नाटक सरकारने हा महामेळावा दडपण्याचा प्रयत्न केला किंवा यासंबंधी कोणताही नकारात्मक निर्णय घेतला, तर अधिवेशनाच्या काळात महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटकच्या कोणत्याही नेत्याला आम्ही फिरण्याची संधी देणार नाही.” असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

Tags: