राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चा रंगू लागल्या असतानाच विजापूर जिल्ह्यातील दोन विद्यमान मंत्र्यांपैकी एकाला आपले पद गमवावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून नव्या मंत्रिमंडळात यशवंतराय गौडा यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. पाहुयात याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट…

राज्यात सध्या मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धा सुरू आहे, तसेच मंत्रिमंडळात कोणताही बदल न होता केवळ विस्तार होईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र, राज्याच्या मंत्रिमंडळात पुनर्रचना झाल्यास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात विजापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे एम.बी. पाटील आणि शिवानंद पाटील हे दोन्ही प्रभावी मंत्री पुढील अडीच वर्षांसाठी पदावर कायम राहणार की, त्यांना वगळले जाईल, याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे. किंवा दोघांपैकी एकाला पदमुक्त करून दुसऱ्याला कायम ठेवले जाईल का, याकडेही लक्ष लागले आहे. एकीकडे इंडीचे आमदार यशवंतरायगौडा पाटील मंत्री होण्याची शक्यता जास्त आहे, तर दुसरीकडे मुद्देबिहाळचे आमदार सी.एस. नाडगौड यांनीही मंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू केली आहे. या दोघांपैकी कोणाला नशीब साथ देणार, याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
आमदार यशवंतरायगौडा यांनी आपले मत स्पष्टपणे मांडले आहे. “काँग्रेस सरकार स्थापन करताना जिल्ह्यातील आमदारांसोबत झालेल्या बैठकीत खातेवाटपाबद्दल एक करार झाला होता. पक्षश्रेष्ठींनी मंत्रीपदाची ग्वाही दिली होती. दिलेला शब्द पक्ष नक्कीच पाळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी आपली मागणी पक्षाच्या हायकमांडसमोर ठेवली आहे.
दरम्यान, मुद्देबिहाळचे आमदार सी.एस. नाडगौड हे देखील मंत्रीपदासाठी श्रेष्ठींच्या स्तरावर लॉबिंग करत आहेत. त्यांना यापूर्वी एकदा मंत्री म्हणून काम करण्याचा आणि नवी दिल्लीतील विशेष प्रतिनिधी म्हणून काम करण्याचा अनुभव व ज्येष्ठता आहे. सध्या ते कर्नाटक साबण-डिटर्जंट महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. “जिल्ह्यात दोन मंत्री आहेत. त्यांच्यापैकी कोणीही मंत्रीपदाचा त्याग केल्यास, त्या जागेसाठी माझ्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीचा विचार करावा, अशी विनंती मी हायकमांडकडे केली आहे. हायकमांड जो निर्णय देईल, त्यानुसार आम्ही वागू. मी कोणालाही पदत्याग करण्यास सांगणार नाही, तसेच मी इतका मोठा नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
एकंदरीत पाहता, विजापूर जिल्ह्यातून एम.बी. पाटील आणि शिवानंद पाटील यांनी विद्यमान मंत्री म्हणून अधिकार उपभोगला आहे. तसेच, सी.एस. नाडगौड सध्या महामंडळाचे अध्यक्ष आहेत. जर अधिकार वाटपाचे सूत्र सुरळीत पार पडले, तर आमदार यशवंतरायगौडा पाटील यांना संधी मिळणे निश्चित आहे, असे मत काँग्रेस वर्तुळात व्यक्त होत आहे. काँग्रेस हायकमांड नेमका कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Recent Comments