Belagavi

बेळगाव : एपीएमसी पोलिसांकडून घरफोडीप्रकरणी आरोपीला अटक

Share

बेळगाव शहर एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरफोडीच्या आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ३ लाख ७८ हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

ही कारवाई एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सह्याद्री नगर येथील लीना अमजद पठाण यांच्या घरी झालेल्या चोरीच्या तक्रारीनंतर करण्यात आली. दिनांक ०७/११/२०२५ रोजी लीना अमजद पठाण यांच्या घरातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार एपीएमसी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यू एस अवटी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दिनांक १९-११-२०२५ रोजी संशयित आरोपी गवि सिद्धप्पा लक्ष्मप्पा हुलसेर याला ताब्यात घेतले. हा आरोपी बेळगावच्या रघुनाथ पेठ, अनगोळ येथे वास्तव्यास होता, मात्र तो मूळचा गोवा राज्यातील फोंडा येथील रहिवासी आहे. चौकशीदरम्यान त्याने सदर घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून सुमारे ३,७८,११० रुपये किमतीचे ३३.३० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणात आरोपीचा शोध घेण्यासाठी एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यू एस अवटी, पीएसआय एस आर मुत्तत्ती, एम ए पाटील, तसेच कर्मचारी आणि तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले. बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांनी या पथकाच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.

Tags: