Bailahongala

बैलहोंगल : कसलेल्या जमिनीतून हुसकावल्याने शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन

Share

आपण कसलेल्या सुपीक कृषी जमिनीतून हुसकावून लावले जात असल्याचा आरोप करत बायलाहोंगल तहसीलदारांविरोधात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी विषारी औषधाची बाटली हातात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले.

हातात विषाची बाटली घेऊन धरणे धरलेल्या या शेतकरी कुटुंबांचे वास्तव्य बेळगाव जिल्ह्यातील बायलाहोंगल तालुक्यातील कडसगट्टी गावात आहे. ही शेतकरी कुटुंबे गेल्या ४५ वर्षांपासून ३० एकर गोमाळ जमीन कसत आहेत. ‘उळुववने भू ओड्या’ कसेल त्याची जमीन या कायद्यांतर्गत ही जमीन आपल्या नावावर करण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज केला होता. मात्र, अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आजतागायत ही जमीन शेतकऱ्यांच्या नावावर हस्तांतरित झाली नसून, आता त्यांना याच जमिनीतून हुसकावून लावण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आता तहसीलदार अचानक येऊन जमीन तातडीने खाली करण्यासाठी दबाव टाकत आहेत. “आम्हाला आमची जमीन द्या, नाहीतर आम्हाला विष द्या,” अशा शब्दांत संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. न्याय मिळवण्यासाठी हे शेतकरी कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहे.

बसवराज पाटील, भारती पाटील यांच्यासह अन्य शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Tags: