काँग्रेस पक्षामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी तीन नेत्यांमध्ये स्पर्धा भडकली असून, याच पार्श्वभूमीवर घोडेबाजार जोरात सुरू आहे, असा गंभीर आरोप चित्रदुर्गचे खासदार गोविंद कारजोळ यांनी केला आहे.

काँग्रेस आमदारांना ५० कोटींपासून ७० कोटी रुपयांपर्यंतच्या ऑफर सुरू असून, या आठवड्यात हा आकडा १०० कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असे गोविंद कारजोळ यांनी विजापूर शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले.
गोविंद कारजोळ यांनी काँग्रेसच्या हाय कमांडवर टीका करताना, ‘या पक्षाचे हाय कमांड हे घोडेबाजार थांबवण्यात पूर्णपणे असहाय्य झाले आहे,’ असे म्हटले. राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी तीन नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झाल्याने प्रशासन पूर्णपणे कोसळले आहे, असा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला. शेतकरी संकटात असूनही सरकार निष्क्रिय आहे. मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी खरेदी केंद्रे नाहीत आणि योग्य भाव मिळत नसल्याने ते त्रस्त आहेत. तसेच, पुरामुळे नुकसान झालेल्यांना मदत देण्यासाठीही सरकार विलंब करत आहे. त्यामुळे राजकीय गोंधळ बाजूला ठेवून जनतेच्या समस्यांवर लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
गोविंद कारजोळ यांनी दलित नेतृत्वाच्या मुद्द्यावरूनही काँग्रेसवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “काँग्रेस पक्ष दलित नेत्याला मुख्यमंत्री करणार नाही, मी हवे असल्यास बॉण्डवर लिहून देतो.” त्यांनी परमेश्वर आणि मुनियप्पा यांच्या नावांचा उल्लेख करत, दलित समाजाच्या स्वाभिमानाला काँग्रेसने ठेच पोहोचवली असल्याची टीका केली. काँग्रेसच्या अंतर्गत कलहामुळे राज्यात अस्थिरता असली तरी, कोणत्याही परिस्थितीत भाजप सरकार स्थापन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, डीकेशी आणि अमित शहा यांच्या भेटीची बातमी खोटी असल्याचेही त्यांनी सांगितले.
गोविंद कारजोळ यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना, सध्या सिद्धरामय्या गट, डी.के. शिवकुमार गट आणि लिंगायत गट असे तीन गट काँग्रेसमध्ये पडले आहेत. हाय कमांडने जणू सरकारच लिलावात काढले आहे आणि जो जास्त पैसे देईल, त्याला सत्ता मिळेल, अशी टीका केली.


Recent Comments