विजापूरमधील १५ वर्षीय उदयोन्मुख सायकलपटूने राज्यस्तरावर यश मिळवले आहे; परंतु हालकीच्या परिस्थितीमुळे तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगतीसाठी आवश्यक असणारी महागडी रोड सायकल घेणे अशक्य झाले आहे. या प्रतिभेला मदतीचा हात देण्यासाठी तिच्या कुटुंबाने पालकमंत्र्यांसह दानशूर व्यक्ती आणि संस्थांना भावनिक आवाहन केले आहे.

विजापूरजवळील तोरवी गावात मोलमजुरी करणाऱ्या मल्लिकार्जुन आणि भाग्यश्री यांची कन्या भूमिका सायकलिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करत आहे. राज्य आणि विभागीय स्तरावर पदके मिळवलेल्या या नववीतील विद्यार्थिनीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्याचे स्वप्न आहे. मात्र, सध्या ती शासकीय वसतिगृहातील साध्या सायकलवर सराव करत आहे. रोड सायकल खरेदीसाठी पुरेसे पैसे नसल्याने, ‘जर पालकमंत्री एम. बी. पाटील आणि मंत्री शिवानंद पाटील यांनी मदत केली, तर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर निश्चितच यश मिळवून दाखवेन,’ अशी तीव्र इच्छा सायकलपटू भूमिका बूदिहाळ हिने व्यक्त केली.
मजुरीवर अवलंबून असलेल्या या मुलीच्या पालकांनी मुलीच्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी २५ हजार रुपयांचे कर्ज घेऊन सायकल दिली. मात्र, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रोड सायकलसाठी ५ ते १० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. एवढा मोठा खर्च शक्य नसल्याने पालक हताश झाले आहेत. यासाठी पालकांनी क्रीडा विभागाकडे मागणी केली असता, इतक्या महागड्या सायकलसाठी निधीची तरतूद नसल्याचे विभागाने स्पष्ट केले.
आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून जर मंत्री एम. बी. पाटील, शिवानंद पाटील आणि इतर लोकप्रतिनिधींनी मदत केली तर , तर माझ्या मुलीच्या यशातून आम्ही त्यांचे कृतज्ञ राहू असे भावनिक आवाहन भूमिकांचे वडील मल्लिकार्जुन यांनी केले आहे.
याबाबत तिचे प्रशिक्षक चंद्रकांत यांनीही भूमिकेच्या प्रतिभेला पाठिंबा दिला. ते म्हणाले, “या मुलीमध्ये मोठी क्षमता आहे. केवळ योग्य साधनांच्या अभावामुळे तिची प्रतिभा वाया जाता कामा नये. शासनाने किंवा दानशूर व्यक्तींनी मदत केल्यास ती नक्कीच मोठे यश मिळवू शकेल.”
एकूणच, गरिबीतून वर आलेल्या या मुलीने सायकलिंगमध्ये मोठे यश मिळवण्याचे ठरवले आहे. तिच्या यशाला गरिबीचा अडथळा येऊ नये. मंत्री, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी मदत करून तिच्या यशाला प्रेरणा द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.


Recent Comments