उत्तर कर्नाटकातील आमदारांनी आणि मंत्र्यांनी सभागृहात निष्क्रियता न दाखवता आपल्या समस्या प्रभावीपणे मांडाव्यात. माझ्यावर अविश्वासाचा ठराव मांडायचा असेल तर तो सभागृहाच्या अखत्यारीत आहे; सभागृह हेच सर्वोच्च आहे, असे विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी स्पष्ट केले.

आज बेळगावात बोलताना ते म्हणाले, बेंगळुरूप्रमाणे बेळगावातही अधिवेशन घेतले जाते, पण येथील अतिरिक्त आंदोलनांमुळे हे अधिवेशन ‘आंदोलनांचे अधिवेशन’ ठरले. मागील वेळी उत्तर कर्नाटकातील आमदारांपेक्षा दक्षिण कर्नाटकातील आमदारांनी सभागृहात अधिक चर्चा केली. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर आमदार निष्क्रिय होऊन निघून जातात. असे न करता, या वेळी बुधवार किंवा गुरुवारी प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर संपूर्ण दिवस उत्तर कर्नाटकातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी राखीव ठेवला जाईल. यावेळी पूर्वीसारखे होणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असून, योजना व समस्यांचे निवारण करावे, असे आम्ही सांगितले आहे, असे त्यांनी म्हटले.
तसेच, सरकारी कार्यालये सुवर्णसौध येथे स्थलांतरित करण्यासाठी सरकारने कडक पाऊले उचलावीत, असे ते म्हणाले. उत्तर कर्नाटकातील आमदार-मंत्र्यांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव आहे. त्यांनी पक्षभेद विसरून उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी प्रबळ आवाज उठवावा. मंत्र्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याबाबत त्यांना सांगितले जाईल. अधिवेशनादरम्यान येणाऱ्या आमदारांसाठी आमदार निवास बांधण्यासाठी शासनाला पत्र देण्यात आले आहे, असे त्यांनी नमूद केले.
शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, अन्याय होत असताना शिक्षकांनी गप्प बसू नये. शिक्षक मानसिकदृष्ट्या समाधानी असतील, तरच उत्तम अध्यापन करू शकतात. सीमाभागात मुलांचे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश वाढल्यामुळे सरकारी शाळांकडे कल कमी झाला आहे. महाराष्ट्रात कन्नड शाळांना प्रोत्साहन दिले जाते, त्याचप्रमाणे कर्नाटकातही मराठी शाळांना मदत केली जात आहे. मराठी लोकांना कन्नड शिकण्यात रस आहे, अजूनही मराठी शाळा आहेत; परंतु, पूर्वीच्या तुलनेत त्यांची संख्या कमी झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
स्वत:वर अविश्वास ठराव मांडण्याच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, अविश्वास ठराव मांडण्यासाठी काही योग्य कारणे आवश्यक आहेत. “आम्ही ४५ वर्षांपासून राजकारणात आहोत. अविश्वास ठरावाचा निर्णय सभागृह घेईल. वेळ आल्यास आम्ही सभागृहावर सोडून देऊ. सभागृह हेच सर्वोच्च आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.


Recent Comments