बेळगावची गौरवशाली संस्था असलेल्या राणी चन्नम्मा महिला सहकारी बँक लिमिटेडने २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करत प्रतिष्ठित पुरस्काराला गवसणी घातली आहे. बँकेला “बेळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट नफा कमावणारी बँक-२०२५” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

बेंगळुरू येथील कर्नाटक राज्य नागरी सहकारी बँकांच्या महासंघाने आयोजित केलेल्या ७२ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहा-२०२५ च्या वेळी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी हावेरी येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात बँकेच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीची प्रशंसा करण्यात आली. या प्रसंगी बँकेच्या अध्यक्षा डॉ. प्रीती के. दोड्डवाड आणि उपाध्यक्षा रूपा जे. मुनवळ्ळी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
राणी चन्नम्मा बँकेने २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. यानुसार, बँकेच्या ठेवी ४०२.७८ कोटी रुपये, कर्ज २५२.७९ कोटी रुपये आणि निव्वळ नफा ८.९४ कोटी रुपये इतका झाला आहे. ही उल्लेखनीय कामगिरी संचालक मंडळ आणि व्यवस्थापन मंडळाचे मजबूत नेतृत्व, कर्मचाऱ्यांचे अतूट समर्पण आणि सदस्य तसेच ग्राहकांच्या सततच्या विश्वास आणि पाठिंब्याचा परिणाम आहे, असे बँक व्यवस्थापनाने स्पष्ट केले.
कार्यक्रमाला कर्नाटक विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी, आमदार आणि विधानसभा अध्यक्ष रुद्रप्पा लमाणी, कर्नाटक नागरी बँक महासंघाचे अध्यक्ष आमदार जी. टी. देवेगौडा आणि बेळगाव सहकारी संस्थांचे संयुक्त निबंधक कल्लप्पा ओबनगोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते .


Recent Comments