भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार, अर्जुन आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या डायना एडुल्जी यांनी, क्रीडापटूंसाठी फिजिओथेरपी ही आता अत्यंत आवश्यक आणि महत्त्वपूर्ण ठरली आहे, असे मत व्यक्त केले.

केएलईच्या इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपीने आयोजित केलेल्या ‘पर्ल फिजिओकॉन २०२५’ या आंतरराष्ट्रीय फिजिओथेरपी संमेलनाचे उद्घाटन करताना डायना एडुल्जी म्हणाल्या, फिजिओथेरपीमुळे खेळाडूंना तंदुरुस्त ठेवून पुन्हा मैदानावर आणणे शक्य झाले असून, या क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी आहेत. आज १५ महिला खेळाडूंसाठी २० लोक काम करतात; कारण ही एक सतत आणि कठीण प्रक्रिया आहे, असे त्यांनी सांगितले.
केएलईचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी सांगितले की, गोव्यात लवकरच फिजिओथेरपी महाविद्यालय सुरू करण्याची योजना असून, आवश्यक रुग्णालय आणि प्रशिक्षण सुविधा उपलब्ध केल्या जातील. हुबळी येथील हजार खाटांचे रुग्णालयही लवकरच जनतेच्या सेवेत समर्पित केले जाईल. कृषी, आरोग्य आणि शिक्षणाद्वारे समाजाचा विकास करणे तसेच प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणे, हे आपले ध्येय आहे.
यावेळी कर्नाटक राज्य अलायड आणि हेल्थकेअर कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. इफ्तिकार अली, भारत सरकारचे फिजिओथेरपी प्रोफेशनल कौन्सिलचे सदस्य डॉ. अली इराणी, डॉ. व्ही पी गुप्ता, डॉ. आशिष कक्काडा, डॉ. केतन भाटीकर यांनीही आपले मत व्यक्त केले. मंचावर केएलईचे कुलसचिव डॉ. व्ही एम पट्टणशेट्टी, डॉ. संजीवकुमार, डॉ. विजय कागे, डॉ. दीपा मेटगुडे उपस्थित होते. डॉ. संतोष मेटगुडे यांनी स्वागत केले, तर डॉ. गणेश बी आर यांनी आभार मानले.


Recent Comments