Belagavi

सरकारी शाळा विलीनीकरण विरोधात बेळगावात ‘एआयडीएसओ’चे आंदोलन

Share

‘ऑल इंडिया डेमोक्रॅटिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशन’ या विद्यार्थी संघटनेने सरकारी शाळा विलीन करण्याच्या कर्नाटक पब्लिक स्कूल – मॅग्नेट योजनेला विरोध दर्शवत शुक्रवारी बेळगावातील चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन केले. संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर केले.

कर्नाटक राज्य सरकारने राज्यात ७०० केपीएस-मॅग्नेट शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत मॅग्नेट शाळेच्या ३ ते ५ किलोमीटर परिसरातील शाळा याच शाळेत विलीन केल्या जाणार आहेत, असे निवेदनात नमूद आहे. याच मॉडेलनुसार चन्नपट्टणा तालुक्यातील हॉंगानूर येथील सरकारी शाळा मॅग्नेट स्कूल म्हणून निश्चित करण्यात आली आहे.

या धोरणामुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. आपल्या गावातील शाळा वाचवाव्यात आणि त्यांचा विकास करून स्थानिक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. ७०० केपीएस मॅग्नेट शाळांमुळे राज्यातील हजारो शाळा विलीन होतील, अशी भीती आहे. यामुळे समुदायामधील शाळा दुसऱ्या गावात जाईल. त्यामुळे केपीएस मॅग्नेट शाळा बंद करू नयेत, अशी मागणी आंदोलकांनी केली.

Tags: