बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील यल्लम्मावाडी गावात ऊस भरलेला ट्रॅक्टर उलटून झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

तेलसंग गावातील रामप्पा निंगप्पा सावळगी वय ४० हे या अपघातातील दुर्दैवी मयत व्यक्ती आहेत. अमावस्या असल्यामुळे ते यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन परतत असताना ही दुर्घटना घडली. अथणी राज्य महामार्गाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे, यासाठी रस्ता खोदण्यात आला होता आणि दुरुस्तीचे काम चालू होते. याच वेळी ऊस भरलेला ट्रॅक्टर बाजूच्या खड्ड्यात उतरला. त्यामुळे तोल जाऊन ट्रॅक्टर एका बाजूला कलला आणि बाजूने दुचाकीवरून जाणाऱ्या रामप्पा सावळगी यांच्यावर कोसळला. तात्काळ स्थानिक लोकांनी ट्रॅक्टरखालील ऊस बाजूला करून सावळगी यांना बाहेर काढले, मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
रस्त्याचे काम सुरू असताना कोणत्याही प्रकारचे सूचना फलक न लावता निष्काळजीपणे काम सुरू असल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर ऐगळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, त्यांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


Recent Comments