हुक्केरी शहरात येत्या २३ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सव उत्साही समितीच्या वतीने राज्योत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्युत सहकारी संस्थेचे अध्यक्ष महावीर निलजगी यांनी दिली.

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, २३ नोव्हेंबर रोजी पहाटे शहराच्या अडवी सिद्धेश्वर मठाच्या आवारात महास्वामींच्या उपस्थितीत, देशी पारंपरिक वाद्यमेळा आणि कर्नाड संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या वेशभूषा व कलापथकांच्या मिरवणुकीला सुरुवात केली जाईल.
यानंतर, दुपारी कोर्ट सर्कलजवळ आमदार निखिल कत्ती यांच्या हस्ते तरुणांसाठी डीजे कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कन्नडप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी गुरू कुलकर्णी, राजू मुन्नोळी, ए.के. पाटील, अप्पुसी तुबाची, महांतेश तळवार, भीमसी घोरकनाथ, कुमार जुटाळे, सुहास नूली, रमेश बोळगावी, रोहित हेद्दूरशेट्टी यांच्यासह कर्नाटक राज्योत्सव उत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते.
हुक्केरी शहरात दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी तालुका प्रशासनाकडून विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीपर नृत्ये आयोजित करून राज्योत्सव साजरा केला जातो. त्याचप्रमाणे १९ नोव्हेंबर रोजी कन्नड समर्थक संघटना मोठ्या उत्साहाने राज्योत्सव साजरा करतात. आता पुन्हा २३ नोव्हेंबर रोजी राज्योत्सव उत्साही समितीच्या वतीने राज्योत्सव साजरा करून कन्नड भूमीची संस्कृती व परंपरा लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्यात होणारे हे तीनही कार्यक्रम सर्व संघटनांनी एकजुटीने एकाच दिवशी आयोजित केल्यास हुक्केरी येथील राज्योत्सव संपूर्ण राज्यात प्रसिद्ध होऊ शकतो, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.


Recent Comments