Belagavi

बेळगावच्या डॉ. सारंग शेठेंना राष्ट्रीय वैद्यकीय अकादमीचा सर्वोच्च सन्मान

Share

बेळगाव येथील ख्यातनाम अस्थिशस्त्रज्ञ डॉ. सारंग शेठे यांची भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान अकादमीने त्यांची सदस्य म्हणून निवड केली आहे. देशातील केवळ तीन अस्थिशास्त्रज्ञांना मिळालेला हा बहुमान बेळगावच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत गौरवास्पद आहे.

बेळगावचे डॉ. सारंग शेठे यांची राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान अकादमीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील वैज्ञानिक कामगिरीच्या आधारावर दिला जाणारा हा बहुमान अत्यंत दुर्मिळ असून, यंदा देशभरातून केवळ तीन अस्थिशास्त्रज्ञांना तो प्राप्त झाला आहे. गेल्या तीस वर्षांच्या इतिहासात केवळ ४७ अस्थिशस्त्रज्ञांना हा गौरव मिळाला आहे, यावरून या सन्मानाचे महत्त्व स्पष्ट होते. नोव्हेंबर महिन्यात चंदीगड येथे झालेल्या कार्यक्रमात नीती आयोग सदस्य, राज्यपाल आणि वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या निवडीमुळे डॉ. शेठे यांचे राष्ट्रीय स्तरावरील योगदान अधोरेखित झाले आहे.

डॉ. शेठे हे वीस वर्षांपासून अस्थिशस्त्र सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी ‘हिप आर्थ्रोप्लास्टी’ या विषयात डॉक्टरेट मिळवली असून, ते या क्षेत्रात विशेष ज्ञान असलेले मोजके डॉक्टर आहेत. त्यांच्या कामातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे उत्तर कर्नाटकमध्ये त्यांनी सर्वप्रथम यशस्वीपणे केलेली आठ तासांची दुर्मिळ ‘संपूर्ण फीमर प्रत्यारोपण’ शस्त्रक्रिया. याशिवाय, ‘हाडे आणि सांध्यांचे ट्युमर्स’ आणि ‘अवयव वाचवण्याच्या शस्त्रक्रिया’ या क्षेत्रातील त्यांचे कौशल्य प्रशंसनीय आहे. त्यांच्या या राष्ट्रीय कामगिरीबद्दल केएलई संस्थेचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच राष्ट्रीय स्तरावरील अस्थिशास्त्रज्ञांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Tags: