वृक्षमाता ‘सालू मरद तिम्मक्का’ या आता फक्त स्मृतीरूपात उरल्या आहेत. त्यांना अपत्य नव्हते म्हणून त्यांनी खचून न जाता, पतीच्या भक्कम पाठिंब्यावर हजारो झाडे लावून त्यांचे संगोपन केले. त्यांच्या या महान कार्यामुळे त्यांना ‘वृक्षमाता’ ही ओळख मिळाली. तिम्मक्का यांचे आज सकाळी बेंगळुरूमधील जयनगर येथील अपोलो रुग्णालयात ११४ व्या वर्षी निधन झाले.
सालू मरद तिम्मक्का मूळच्या तुमकूर जिल्ह्यातील गुब्बी तालुक्यातील होत्या. त्यांचा जन्म ३० जून १९११ रोजी म्हैसूर संस्थानातील गुब्बी तालुक्यात झाला होता, जो आता तुमकूर जिल्ह्यात येतो. त्यांचे लग्न मागडी (Magadi) तालुक्यातील हुलिकल गावातील बिक्कल चिक्कय्या यांच्याशी झाले होते. त्यांनी कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नव्हते, त्या जवळच्या एका दगडाच्या खाणीत रोजंदारीवर काम करत असत. लग्नाला २५ वर्षे होऊनही त्यांना अपत्य झाले नाही. त्यामुळे तिम्मक्का यांनी मुलांच्या जागी वडाची झाडे लावण्यास सुरुवात केली.
केवळ वडाची झाडेच नव्हे, तर त्यांनी एकूण सुमारे ८,००० हून अधिक रोपे लावली आणि त्यांची जोपासना केली. मुलांच्या दुःखाला विसरून त्यांनी वडाच्या रोपट्यांनाच आपली मुले मानून त्यांचे संगोपन केले. त्यांनी लावलेल्या झाडांचे त्यांनी स्वतः संरक्षण केले. झाडांना कुंपण घालणे, पाणी देणे आणि त्यांचे राखण करणे, हे सारे काम त्या स्वतः करत असत.
वृक्षमाता सालू मरद तिम्मक्का आपल्या या महान कार्यामुळे जगप्रसिद्ध झाल्या. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक पुरस्कार आणि सन्मान त्यांच्याकडे चालत आले. भारत सरकारने २०१९ मध्ये त्यांना देशातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक असलेल्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवले. तिम्मक्का यांना २०१६ मध्ये भारत सरकारकडून राष्ट्रीय नागरिक पुरस्कार, २०१७ मध्ये हम्पी विद्यापीठाकडून ‘नाडाोजा’ पुरस्कार, २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्कार, कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार, कर्नाटक केंद्रीय विद्यापीठाकडून २०२० मध्ये डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले होते.
याव्यतिरिक्त, त्यांना ‘गाईट फ्री ब्रेबिएन्सी राष्ट्रीय पुरस्कार’, ‘राष्ट्रीय इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार’, ‘इंदिरा रत्न पुरस्कार’, ‘कर्नाटक राज्य पर्यावरण पुरस्कार’, ‘महिला सक्षमीकरण पुरस्कार’, ‘हरित माता पुरस्कार’, ‘पर्यावरण प्रियदर्शिनी पुरस्कार’, ‘झाडांची माता पुरस्कार’, ‘जगद्ज्योती बसवण्णा पुरस्कार’, ‘डॉ. बी.आर. आंबेडकर राज्य पुरस्कार’, ‘हरित भारत पुरस्कार’, ‘सहारा भारत पुरस्कार’ यासह अनेक मानसन्मान प्राप्त झाले होते.


Recent Comments