आगामी हिवाळी अधिवेशनात वेळेचा अपव्यय न होता, उत्तम कामकाज होईल. उत्तर कर्नाटकातील ज्वलंत प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा होऊन जनहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील असा विश्वास विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांनी व्यक्त केला.
बिदर येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सभापतींनी हिवाळी अधिवेशनाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी अधिवेशन म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय किंवा मजा-मस्तीसाठी असते असे अनेक वर्षांपासून होत असलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले. “आपण सकारात्मक विचार ठेवले पाहिजेत. जवळपास सर्वच आमदार अधिवेशनात सहभागी होतात. चर्चा रात्री १ वाजेपर्यंत, अगदी १:३० वाजेपर्यंतही चालल्या आहेत आणि अनेक विधेयके मंजूर झाली आहेत,” असे स्पष्टीकरण सभापतींनी दिले.
“उत्तर कर्नाटक भागात होत असलेल्या या अधिवेशनासाठी सामान्य नागरिक, माध्यम प्रतिनिधी आणि संस्थांनी सहकार्य करावे. कर्नाटकच्या जनतेला फायदा होईल, असे निर्णय घेण्यासाठी सभागृहाने उत्तम काम करणे आवश्यक आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
वेगळ्या राज्याच्या मागणीबद्दल विचारले असता, त्यांनी आमदार राजू कागे यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असल्याचे सांगितले. आमदार, सरकार आणि विरोधी पक्ष या सर्वांवर जनतेचा विश्वास कायम ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे, असेही सभापती यु. टी. खादर म्हणाले.


Recent Comments