Belagavi

बेळगावात गांजा सेवन आणि मटका जुगार प्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल

Share

बेळगाव शहर पोलिसांनी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्रपणे धडक कारवाई केली असून, मादक पदार्थांचे सेवन आणि बेकायदेशीर मटका जुगार खेळणाऱ्या एकूण तीन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईदरम्यान माळमारुती आणि हिरेबागेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, एका आरोपीचा शोध सुरू आहे.

माळमारुती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रुक्मिणी नगर ५व्या क्रॉसजवळील सार्वजनिक ठिकाणी संशयास्पदरित्या वावरणाऱ्या आनंद मारुती नाईक (३६) या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने मादक पदार्थाचे सेवन केले असल्याचे स्पष्ट झाले. पीएसआय होन्नप्पा तळवार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी या आरोपीची वैद्यकीय तपासणी केली. याप्रकरणी माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. दुसऱ्या एका कारवाईत, हिरेबागेवाडी-बससापूर रस्त्याच्या कडेला सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारावर पीएसआय बसवराज मिटगार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी छापा टाकला. दरम्यान उल्लेश मडीवाळ कुरबर या आरोपीला ताब्यात घेण्यात आले, तर अहिरुद्दिन इमामसाब नेसरगी नावाचा दुसरा आरोपी फरार झाला. छाप्यादरम्यान, आरोपी उल्लेश कुरबर याला जुगार खेळल्याप्रकरणी अटक करून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या दोन्ही आरोपींविरुद्ध हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, फरार असलेल्या आरोपीचा शोध सुरु आहे.

संबंधित पीएसआय आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याची बेळगाव शहर पोलिस आयुक्त आणि डीसीपी यांनी प्रशंसा केली आहे.

Tags: