Chikkodi

स्वतंत्र उत्तर कर्नाटकासाठी चिक्कोडी जिल्हा कृती समितीचा पाठिंबा

Share

उत्तर कर्नाटक राज्याच्या स्वतंत्र मागणीला चिक्कोडी जिल्हा कृती समितीने जाहीर पाठिंबा दर्शवला असून, स्थानिक आमदार राजू कागे यांनी केलेल्या वक्तव्याचे समितीच्या सदस्यांनी स्वागत केले आहे.

चिक्कोडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा कृती समितीच्या सदस्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. चिक्कोडीला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याकडे सरकारांनी दुर्लक्ष केल्याने, जर उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्य झाले, तर चिक्कोडीचा जिल्हा बनण्याचा मार्ग मोकळा होईल, उत्तर कर्नाटकात सतत अन्याय होत आहे. सरकारने मागणीकडे दुर्लक्ष केल्याने स्वतंत्र राज्यामुळेच चिक्कोडी जिल्हा होईल, असा विश्वास समितीचे अध्यक्ष संजु बडिगेर यांनी व्यक्त केला.

त्यानंतर जिल्हा कृती समितीचे सचिव चंद्रकांत हुक्केरी यांनी आपले मत मांडले. आमदार कागे यांचे स्वतंत्र राज्याबाबतचे वक्तव्य स्वागतार्ह असून, उत्तर कर्नाटक विभागाला सावत्र आईसारखी वागणूक मिळत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “दक्षिण कर्नाटकात दर १० किमी अंतरावर जिल्हा आहे, पण बेळगाव जिल्ह्याचा प्रचंड मोठा विस्तार असूनही त्याचे विभाजन केले जात नाही. उत्तर कर्नाटक विभागाला दुजाभाव मिळत असल्याने, या राज्याच्या निर्मितीसाठी सुरू असलेल्या संघर्षाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

यावेळी रुद्रय्या हिरेमठ, अमूल नावी, सिद्राम करगावे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

Tags: