विजापूर जिल्ह्याच्या ‘जीवनदायिनी’ मानल्या जाणाऱ्या कृष्णा आणि भीमा नद्यांचे पाणी ‘सी’ दर्जाच्या पातळीपर्यंत प्रदूषित झाले आहे, अशी चिंताजनक माहिती राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून समोर आली आहे.

राज्य पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या अहवालानुसार, विजापूर जिल्ह्यातील भीमा आणि कृष्णा नद्यांचे पाणी ‘सी’ दर्जाच्या पातळीपर्यंत दूषित झाले आहे. कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी, गटाराचे पाणी आणि अनियंत्रित वाळू उपसा ही यामागची प्रमुख कारणे आहेत.
नदीचे पाणी वरून स्वच्छ दिसत असले तरी, त्यात धोकादायक रासायनिक घटक मिसळलेले आहेत. शुद्धीकरण न करता हे पाणी पिण्यासाठी वापरल्यास गंभीर आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.
भीमा नदीला मिळणाऱ्या सीना आणि वीरभटकर या उपनद्यांचे पाणीही सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. तसेच, धार्मिक स्थळांच्या आसपास प्लास्टिक, कपडे आणि इतर वस्तू पाण्यात टाकल्यामुळे प्रदूषण वाढले असल्याचेही अहवालात नमूद केले आहे.
अति प्रमाणात होणाऱ्या वाळू उपशामुळे नद्यांची नैसर्गिक शुद्धीकरण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे या पाण्याचा दर्जा कधी ‘बी’ तर कधी ‘सी’ श्रेणीत आढळत आहे. पावसाळ्यात प्रदूषणाचे प्रमाण अधिक वाढते, असे उप पर्यावरण अधिकारी विवेक यांनी सांगितले आहे.


Recent Comments