बेळगाव शहराच्या माळमारूती पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, पोलिसांनी एका धारदार आणि प्राणघातक शस्त्रासह फिरणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

या आरोपीकडून अवैधपणे बाळगलेला कोयता जप्त करण्यात आला असून, आरोपीविरोधात शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
१२ नोव्हेंबर २०२५ रोजी माळमारूती पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपनिरीक्षक होन्नप्पा तळवार गस्त घालत असताना न्यू गांधीनगरच्या मुख्य रस्त्यावर एक व्यक्ती धारदार कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, केजीएन गल्लीतील ‘रौडीशिटर’ आरोपी मुस्ताक दस्तगीरसाब दावणगेरे (वय ३३, रा. ४ थी क्रॉस, न्यू गांधीनगर, केजीएन गल्ली, बेळगाव शहर) हा अवैधपणे धारदार कोयता घेऊन फिरत असल्याचे दिसून आले. उपनिरीक्षकांनी तत्काळ कारवाई करत त्याच्याकडील कोयता जप्त केला. या आरोपीविरुद्ध माळमारूती पोलीस ठाण्यात गुन्हा केपी ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलीस दलाच्या या कारवाईबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी या कामगिरीबद्दल प्रशंसा व्यक्त केली.


Recent Comments