बेळगावमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सर्व उपसमित्यांच्या कामाचा आढावा घेतला. सुरक्षा व्यवस्था, वाहतूक, भोजन, आरोग्य आणि संपर्क सेवांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी त्यांनी अत्यंत कठोर सूचना दिल्या आहेत.

डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विधान मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे मागील वर्षाप्रमाणेच उत्कृष्ट आयोजन व्हावे यासाठी उपसमित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या उपसमित्यांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडून कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिल्या. सुवर्ण विधान सौध येथे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारी बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी महत्त्वाच्या सुविधा त्वरित उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. सुरक्षा विचारात घेऊन, अधिकारी, कर्मचारी आणि मार्शल यांच्यासाठी पोलीस विभागाच्या समन्वयाने ‘पास’चे वाटप करावे; तसेच सुवर्ण विधान सौधच्या तळमजल्यावर स्वतंत्र भोजन व्यवस्था आणि बाहेर ‘पेड कॅन्टीन’ सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आंदोलनाच्या संभाव्य जागा निश्चित करून तिथे पाणी व इतर सुविधा पुरवण्याचे आदेशही देण्यात आले. यासोबतच, आंदोलनाच्या ठिकाणांसह मंत्री, आमदार, मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानाजवळ वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका तैनात ठेवावी. वाहतूक व्यवस्थेसाठी वाहने सुस्थितीत असल्याची खात्री करावी. कोणत्याही परिस्थितीत अधिवेशनादरम्यान फोन आणि इंटरनेट नेटवर्कमध्ये अडथळा येऊ नये, यासाठी तांत्रिक तयारी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी बोलताना सांगितले, अधिवेशन पाहण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना ‘पास’ वितरित करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक कागदपत्रे घ्यावीत. सुवर्ण सौधमध्ये येणाऱ्या वाहनांना दिलेले पास तपासूनच त्यांना प्रवेश दिला जाईल.
या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अभिनव जैन, अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि वाहतूक, भोजन, निवासस्थान यासह सर्व उपसमित्यांचे प्रमुख उपस्थित होते.


Recent Comments