Belagavi

‘परप्पन अग्रहारा’तील व्हायरल व्हिडीओवरून भाजप आक्रमक

Share

राज्याच्या कारागृहांमध्ये कैद्यांना शाही बडदास्त दिली जात असल्याच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी भाजपने आज बेळगाव येथे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

राज्याच्या कारागृहांमध्ये कैद्यांची शाही बडदास्त ठेवण्याच्या धोरणाचा निषेध करत भाजपने एसपी कार्यालयासमोर आंदोलन केले. भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.

भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी यावेळी बोलताना गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, “कारागृहांमधील कैद्यांना ड्रग्जसह अनेक सुविधा पुरवल्या जात आहेत. आय.एस.एस. दहशतवाद्यांना राज्य सरकार राज्यातिथी देत आहे. राज्यातील सर्व पोलिस ठाणी काँग्रेसच्या प्रशासकीय कार्यालयांमध्ये रूपांतरित झाली आहेत. ड्रग्ज माफियांना राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे.” परप्पन अग्रहाराचा व्हायरल व्हिडीओ जुना असल्याचे सांगून सरकार आपल्या चुकीतून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. तात्काळ मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

“देशद्रोही आणि समाजविघातक कृत्ये केल्यामुळेच कैदी तुरुंगात आहेत. अशा कैद्यांना राज्यातिथी दिली जात आहे,” असे पाटील यांनी म्हटले. जी. परमेश्वर यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे गृहखाते कायदा व सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय लोक गुन्हेगार झाल्यावर त्यांना साधे भेटण्याची परवानगीही न देणारे पोलीस, कारागृहांमध्ये असलेल्या देशद्रोही कैद्यांना मात्र सर्व सुविधा पुरवत आहेत. आज कारागृहे रेसॉर्टसारखी झाली आहेत. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी आपली चूक मान्य करून नैतिक जबाबदारी घेत राजीनामा द्यावा, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

एसपी कार्यालयाला घेराव घालण्यासाठी पुढे सरसावलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन व्हॅनमधून दूर नेले.

Tags: