सहकार क्षेत्रात कोणतेही राजकारण करणार नाही; उपाध्यक्ष राजू कागे यांची ग्वाही

“आम्ही बोलल्याप्रमाणे वागलो आहोत; लिंगायत समाजाला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोन्ही पदे दिली आहेत. अण्णासाहेब जोल्ले हे सर्वोत्तम अर्थतज्ज्ञ असून, काही दिवसांतच डीसीसी बँकेचे चित्र बदलणार आहे,” असे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी सांगितले.
डीसीसी बँकेसमोर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “आम्ही बोलल्याप्रमाणे वागलो आहोत. लिंगायत समाजाला अध्यक्ष-उपाध्यक्ष पदे दिली आहेत. अण्णासाहेब जोल्ले हे सर्वोत्तम अर्थतज्ज्ञ असून, आगामी पाच वर्षांत डीसीसी बँकेचे चित्र बदलणार आहे,” असे त्यांनी नमूद केले.
डीसीसी बँकेचे नूतन अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी सांगितले की, “जारकीहोळी बंधूंनी माझ्यावर विश्वास ठेवून माझी अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली आहे. मी आणि उपाध्यक्ष राजू कागे यांनी मिळून पुढील पाच वर्षांत डीसीसी बँकेला ‘नंबर वन’ स्थानावर आणण्याचा प्रयत्न करू.” पुढे ते म्हणाले, “विरोधकांनी अपप्रचार केला की आमच्याकडे सत्ता आल्यास बँक दिवाळखोरीत जाईल. मात्र, डीसीसी बँकेला पाच वर्षांत आदर्श बँक बनवण्याचा प्रयत्न केला जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली. “डीसीसी बँक चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. मागील सहा महिन्यांपासून निवडणुकीमुळे प्रशासनात काही दोष निर्माण झाले होते. आता आमच्या पॅनलला बहुमत मिळाले आहे. चांगला कारभार देऊन शेतकऱ्यांना उत्तम प्रशासन देणे हेच आमचे ध्येय आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
डीसीसी बँकेचे नूतन उपाध्यक्ष राजू कागे म्हणाले की, “डीसीसी बँकेतील सर्व संचालकांमध्ये मी वयाने सर्वात ज्येष्ठ आहे. संचालकांमध्ये असलेले छोटे-मोठे गैरसमज दूर करून, सर्वांचा विश्वास संपादन करून बँकेला विकासाकडे नेण्यासाठी मी प्रयत्न करेन. आम्ही सहकार क्षेत्रात कोणतेही राजकारण करणार नाही. सर्व सदस्य मिळून डीसीसी बँकेला आदर्शवत बनवू,” असे ते म्हणाले.


Recent Comments