Bailahongala

ऊस दराच्या निर्णयाविरोधात बैलहोंगलमध्ये कडकडीत बंद

Share

बेळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून ऊस उत्पादक शेतकरी आपल्या हक्काच्या दरासाठी लढा देत आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि साखर कारखानदारांनी अनेक बैठका घेऊन अखेरीस उसाला प्रति टन ₹३,३०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाबद्दल काही भागांमध्ये शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे, तर काही ठिकाणी मात्र तीव्र असंतोष पसरला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यामध्ये सरकारने जाहीर केलेला ₹३,३०० चा दर अमान्य करत शेतकऱ्यांनी आज संपूर्ण शहर बंद ठेवले आहे.

बैलहोंगलच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या भागातील रिकव्हरी अधिक असल्याने उसाला प्रति टन ₹३,५०० इतका दर मिळाला पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. सरकारने जाहीर केलेल्या दरास संमती न दर्शवता, शेतकऱ्यांनी बैलहोंगल शहरात बंद पाळून आंदोलन सुरूच ठेवले आहे.

या आंदोलनाला विविध संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता ऑटो रिक्षा सेवा, बस वाहतूक, सर्व दुकाने, बाजारपेठा तसेच पथारी व्यावसायिकांनीही या बंदच्या हाकेला प्रतिसाद दिला आहे.

हे आंदोलन आणखी किती दिवस सुरू राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: