Belagavi

शेतकऱ्यांच्या लढ्याला अखेर मोठे यश

Share

उसाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या कर्नाटक रक्षण वेदिकेने राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत केले असून, आज बेळगावात विजयोत्सव साजरा केला.

आज बेळगावच्या राणी चेन्नम्मा चौकात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या नारायणगौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत, ऊस उत्पादकांना हमीभाव देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. या आनंदी वातावरणात कार्यकर्त्यांनी जोरदार आतषबाजी करून आणि घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला.

यावेळी बोलताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी म्हणाले, “क.र.वे. नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्यासोबत उभी राहते. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे मोठे काम क.र.वे.च्या या लढ्याने केले आहे.”

यावेळी त्यांनी एक महत्त्वाचे आवाहन केले. “जेव्हा कधी राज्याच्या अस्मितेवर किंवा भाषेवर संकट येते, तेव्हा शेतकऱ्यांनीही राज्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. तुम्ही आमच्यासोबत राहा, आम्ही तुमच्यासोबत राहू.”

राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी मान्य केल्यामुळे क.र.वे. हा विजयोत्सव साजरा करत आहे. “राज्य सरकारने केवळ एकाच भागासाठी हमीभाव न देता, हा निर्णय संपूर्ण राज्यासाठी त्वरित लागू करावा. तसेच, साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची वजनामध्ये फसवणूक करू नये,” अशी जोरदार मागणी त्यांनी केली.

यावेळी क.र.वे.चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: