Kagawad

कागवाडमध्ये दिगंबर मुनी पार्श्वसेन महाराजांचे ‘संलेखना व्रत’

Share

कागवाड तालुक्यामधील शेडबाळ येथील आचार्य शांतीसागर जैन आश्रमात, आचार्य श्रवणरत्न सुबलसागर मुनी महाराजांचे परमशिष्य पार्श्वसेन मुनी महाराजांनी वयाच्या ९२ व्या वर्षी यमसल्लेखन व्रत स्वीकारले.

शुक्रवारी सकाळी शांतीसागर जैन आश्रमात आचार्य धर्मसेन मुनी महाराज, आचार्य जिनसेन मुनी महाराज आणि आचार्य शांतीसेन मुनी महाराज यांनी पार्श्वसेन मुनी महाराजांना यमसल्लेखना व्रत प्रदान केले.

पार्श्वसेन मुनी महाराजांनी बाबानगर येथे श्रवणरत्न सुबलसागर मुनी महाराजांकडून सन १९९९ मध्ये मुनी दीक्षा स्वीकारली होती. गेल्या २६ वर्षांत त्यांनी धर्मसेवा केली. हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी येथे त्यांनी तीन वेळा पायी प्रवास करत धर्मोपदेश केला आणि दर्शन घेतले. त्याचप्रमाणे, त्यांनी श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबलींचेही दर्शन घेतले. मुनी संघातील सर्व मुनी आणि माताजी यांच्यासह त्यांनी धर्म प्रसारासाठी मोठे योगदान दिले आहे.

मुनी महाराजांच्या पूर्वाश्रमाबद्दल माहिती देताना, ते अथणी तालुक्यातील महेशवाडगी गावातील शेतकरी कुटुंबातील होते. त्यांचे वडील नेमनाथ रेगौडर आणि आई कृष्णाबाई यांचे चिरंजीव श्रीपाल रेगौडर यांनी आचार्य देशभूषण मुनी महाराज आणि आचार्य सुबलसागर मुनी महाराजांची सेवा केली, अशी माहिती मुनी संघातील १०५ सुमतीमती माताजी यांनी दिली.

यावेळी आश्रमाचे व्यवस्थापक राजू नांद्रेंसह अनेक श्रावक उपस्थित होते.

Tags: