

बेळगाव महानगर पालिकेने नागरिकांची मोठी समस्या दूर करत, बीएस यडियुरप्पा मार्गावरील कचऱ्याचा ‘ब्लॅक स्पॉट’ हटवला आहे. आरोग्य निरीक्षिका शिल्पा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी येथील परिसराची स्वच्छता करून, त्याला सुशोभित केले आहे.मात्र, यापुढे या भागात कोणीही कचरा टाकल्यास थेट ५ हजार रुपये दंडाची वसुली करण्याचा कडक इशाराही महापालिकेने दिला आहे.
बेळगावातील बळ्ळारी नाल्याला लागून असलेल्या बीएस यडियुरप्पा मार्गावर तयार झालेला ‘ब्लॅक स्पॉट’ महापालिका कर्मचाऱ्यांनी हटवून, तेथे अत्यंत सुंदर वातावरण निर्माण केले आहे.
बेळगावातील बळ्ळारी नाल्याला लागून असलेल्या वॉर्ड क्रमांक २१ मधील बीएस यडियुरप्पा मार्गावर अलीकडेच एक ‘ब्लॅक स्पॉट’ तयार झाला होता. महापालिका कर्मचाऱ्यांनी अनेकदा येथील कचऱ्याची विल्हेवाट लावली होती. मात्र, कर्मचारी नसताना गोदामातील टाकाऊ वस्तू, प्लॅस्टिक, रासायनिक द्रव्ये, वैद्यकीय कचरा आणि जुनी वस्त्रे यांसारख्या निरुपयोगी वस्तू येथे टाकल्या जात होत्या. इतकेच काय, काही लोक या कचऱ्याला आगही लावत होते. या कारणामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण निर्माण झाले होते, ज्यामुळे येथील नागरिकही त्रस्त झाले होते.
या पार्श्वभूमीवर, आज आरोग्य निरीक्षिका शिल्पा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली महापालिका कर्मचाऱ्यांनी ‘ब्लॅक स्पॉट’ हटवून, आपल्या सुंदर कल्पना व नियोजनाने परिसराची स्वच्छता केली आणि त्याचे सुशोभीकरण केले आहे. या ठिकाणी पुन्हा कोणी कचरा टाकल्यास, ५ हजार रुपये दंड आकारला जाईल, असे सांगण्यात आले आहे.
“या ठिकाणी पुन्हा कचरा टाकून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कोणत्याही परिस्थितीत ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून परिसर स्वच्छ ठेवावा.” असे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments