रस्ता विचारण्याच्या बहाण्याने एका वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला चिकोडी तालुक्यातील नागरमुन्नोळी गावात नागरिकांनी एकत्र येत चांगलाच चोप दिला.

बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यामधील नागरमुन्नोळी गावात एका वृद्धेची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तींनी केला. शेतात काम करत असलेल्या वृद्धेकडे दोन युवक आले. त्यांनी रस्ता विचारण्याच्या बहाण्याने तिच्या गळ्याला हात घालून मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला. लगेच सावध झालेल्या वृद्धेने मोठ्याने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून जवळच्या शेतात काम करणारे मजूर आणि स्थानिक नागरिक तात्काळ घटनास्थळी धावले.
चोरीचा प्रयत्न करणाऱ्या त्या दोन चोरट्यांना नागरिकांनी पकडले. संतप्त गावकऱ्यांनी त्यांना एका विजेच्या खांबाला बांधून चांगलाच चोप दिला. त्यानंतर या घटनेची माहिती चिकोडी पोलीस ठाण्यात देण्यात आली. चोरीचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, ही घटना चिकोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. वृद्धेचे प्रसंगावधान आणि स्थानिकांनी वेळीच दिलेल्या प्रतिसादाने सोनसाखळी चोरीचा हा प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडला गेला.


Recent Comments