Belagavi

ऊस उत्पादकांच्या धरणे आंदोलनामुळे साखर मंत्र्यांना आली जाग

Share

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सततच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे साखर खाते मंत्री शिवानंद पाटील यांनी आज गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निर्देशानुसार हुबळीतून अचानक बेळगावकडे धाव घेतली आहे.

शेतकरी संघटनांकडून होणारे निषेध आणि घेराव घालण्याची भीती असल्यामुळे, मंत्र्यांच्या प्रवासाचा तपशील गुप्त ठेवण्यात आला होता. मंत्री पाटील यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि साखर आयुक्तांना एका गुप्त ठिकाणी भेटून त्वरित बैठक घेतली.

ऊसाच्या एफआरपी सोबतच अतिरिक्त दर निश्चित करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंत्र्यांना त्वरित घटनास्थळी जाऊन माहिती घेण्याचे निर्देश दिले होते.

मंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी आणि साखर आयुक्तांसोबत सद्यस्थिती, आंदोलनाचे स्वरूप आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर समग्र चर्चा केली. या बैठकीचा तपशील आणि पुढील कार्यवाहीसाठीच्या सूचना ते लवकरच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सादर करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ऊस उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने गंभीर प्रयत्न सुरू केले असून, मंत्र्यांची ही अचानक भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Tags: