
मार्कंडेय सहकारी संस्थेकडून कर्ज परतफेडीसाठी शेतकऱ्यावर अवाजवी दबाव आणल्यामुळे मानसिक तणावातून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी कडोली ग्रामस्थ आणि शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

गुरुवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांनी या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
मार्कंडेय सहकारी संस्था कर्ज मुदतीपूर्वीच शेतकऱ्यांच्या घरी जाऊन छळ करत आहे आणि दबाव आणून वसुली करत आहे. चाळीस हजार रुपये भरूनही संस्थेने पुन्हा दबाव आणला आणि पैसे न भरल्यास घर लिलावात काढण्याची दवंडी संपूर्ण गावात पिटली. या तणावामुळे कडोली गावातील शेतकरी सातेरी होन्नप्पा रुटकुटे यांनी ३१ ऑक्टोबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. सहकारी संस्थेने घरांवर लावलेल्या लिलावाच्या नोटिसा तात्काळ काढून टाकाव्यात. शेतकऱ्याचे कर्ज माफ करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबास योग्य भरपाई द्यावी. अन्यथा, सतत धरणे आंदोलन सुरू ठेवण्यात येईल असा इशारा शेतकरी नेते अप्पासाहेब देसाई यांनी दिला.
यावेळी मृत शेतकऱ्याचे कुटुंबीय, तसेच सुभाष दायगोंडे, राजू कागणीकर, फकीरा सदावर, रामनगौडा पाटील, मारुती कडेमणी, चंद्रामा राजाजी, नामदेव दुडुम, राज्य शेतकरी संघटना आणि हिरवी सेना यांचे सदस्य व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments